हिंगोली : शहरातील गुरू प्रकाश वाटरफिल्टर कारखान्यावर नगरपालिकेच्या पथकाने शनिवारी ( दि. १५ ) दुपारी ३ वाजेच्या सुमारास तोतया ग्राहक पाठवून छापा मारला. यावेळी अंदाजे दिड लाखांचा प्लास्टिकसाठा जप्त केला आहे. पालिकेने सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे सदर कारवाई दरम्यान पालिकेच्या नळाची चोरून जोडणी करून पाण्याचा वापर केल्याचा संशय आहे. याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.
पर्यावरणास घातक अशा बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्याची साठवूण, विक्री, खरेदी, वापर करू नये असे वेळोवेळी हिंगोली नगरपालिकेतर्फे आवाहन केले जात आहे. परंतु शहरात छुप्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर व विक्री सुरूच आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने शनिवारी परत एका ठिकाणी पथकाने कारवाई करून एका कारखान्यातील लाखों रूपयांचे प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात अवैध नळजोडणी घेऊन त्यावर पाण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती नगरपालिकेच्या पथकाला मिळाली. त्यानुसान मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून धडक कारवाई करण्यात आली. पथकाने तोतया ग्राहक पाठवून कारखान्याची माहिती घेतली. त्यानंतर धडक कारवाई करून पाणी पाऊच तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक रोल, पाणी पाऊचच्या पिशव्या व इतर साहित्य जप्त करण्यात आल्या आहेत. कारखान्यात प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी भरले जात होते. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही नष्ट केल्या जात होत्या. मनोज तुळशीराम शर्मा यांचा हा कारखाना असल्याचे पथकाने सांगितले. हा प्रकार कधीपासून सुरू आहे, पालिकेच्या नळाच्या पाण्याचा वापर कधीपासून केला जातो यासह विविध चौकशीला आता कारखानामालकास सामोरे जावे लागणार आहे. भरवस्तीत हा कारखाना सुरू असल्याने नेमका काय प्रकार आहे सुरू आहे, कारवाई कशासाठी केली जात आहे हे बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी कारखान्यावरील कामगारांची सखोल चौकशी करण्यात आली.