हिंगोली : म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता वाढत चालले आहेत. जिल्ह्यात जवळपास १७ रुग्ण झाले असून, एकाचा मृत्यूही झाला आहे. या आजारासाठी महागडी औषधे लागत असून, त्यासाठी खर्च आठ लाखांचा अन् शासनाची मदत दीड लाखांचीच अशी गत झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत रुग्ण तेवढे गंभीर होत नव्हते. शिवाय जास्त दिवस ऑक्सिजनवर राहण्याची वेळ येत नव्हती. दुसऱ्या लाटेत जास्त संख्येने रुग्ण गंभीर होत होते. शिवाय या लाटेत अशा रुग्णांना कोविडमधून बरे झाल्यावर म्युकरमायकोसिसची लक्षणेही समोर आली. यात पहिल्या टप्प्यात उपचार घेतले तर तेवढा खर्च येत नाही. मात्र, आजार बळावला तर सलग चार ते पाच आठवडे रोज इंजेक्शन व इतर चाचण्या करण्यात हिंगोलीसारख्या ठिकाणी रुग्णालयात दाखल झाल्यास पाच ते सहा लाखांचा खर्च येतो. मात्र, मोठ्या शहरात दाखल झाल्यास आठ ते दहा लाखांचाही खर्च होऊ शकतो. त्यामुळे आता अनेक रुग्ण या खर्चामुळेही हैराण झाले आहेत. काहींना नांदेड, औरंगाबाद, पुणे येथे संदर्भित केले आहे. तेथेही यावरील औषधे मिळत नसून, मिळाली तरीही मोठा खर्च करावा लागत आहे.
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण
१७
म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू
१
रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव
हिंगोलीत केवळ शासकीय रुग्णालयातच म्युकरमायकोसिसवरील औषधे उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांत याबाबतचे इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयातच उपचार करावे लागत आहेत. अनेक रुग्णांनी हिंगोलीत उपचार घेण्याऐवजी औरंगाबाद, नांदेड, पुणे गाठले आहे. अशा रुग्णांनाही तेथे उपचारासाठी औषधे मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांचा आजार बळावला आहे, त्यांना चार ते पाच लाखांपर्यंतचा खर्च आतापर्यंत करावा लागला आहे. एवढे करूनही रुग्ण हाती लागेल की नाही, याची चिंता सतावत आहे. शिवाय शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, पूर्ण उपचार एकतर शासकीय संस्थेत मिळावेत अथवा हा खर्च वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
मोफत औषधे नावालाच
जिल्हा रुग्णालयात मोफत औषधे मिळत आहेत, हे खरे आहे. मात्र, रुग्णांना या आजाराची भीती बसल्याने नातेवाईक इतर ठिकाणी हलवत आहेत. मोठ्या रुग्णालयात दाखल केले तर तेथे औषधांची टंचाई आहे. बाजारपेठेतही यावरील औषधे मिळत नाहीत. त्यामुळे औषधे मोफत असल्याचे सांगणे हे नावालाच आहे.
हिंगोली जिल्हा रुग्णालयातही आता २५ इंजेक्शनच शिल्लक आहेत. रुग्णसंख्या जशी वाढेल, तेव्हा ती पुरणारही नाहीत. दहा हजार इंजेक्शन मागवली आहेत, मात्र अजून ती मिळालेली नाहीत.
केंद्र व राज्य शासन आता म्युकरमायकोसिसबाबत गंभीर झाले आहे. या आजारावरील औषधे व त्यासाठीचे स्वतंत्र वाॅर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी वारंवार बैठकाही घेतल्या जात आहेत.