हिंगोली : घरातील किरकोळ वादातून पतीनेच पत्नीला पेटवून दिल्याची घटना हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली. जखमी महिलेवर अकोला येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी ( दि.१०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणघाट येथील जळीतकांडाची घटना ताजी असताना हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे घरातील किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात सदर महिला ७८ टक्के भाजली असून तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगीता शंकर हनवते (२६) असे मृत्यूशी झुंज देणाºया महिलेचे नाव आहे. महिलेस मागील अनेक महिन्यांपासून पती आणि सासू किरकोळ कारणावरून भांडत असत. तसेच शारीरिक व मानसिक छळ करीत.
मागील काही दिवसांपासून किरकोळ वादावरून घरात पती व पत्नीत अधिकच भांडण सुरू झाले. आणि ९ फेबु्रवारी रोजी शंकर हनवते याने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल आतून पेटवून दिले. यावेळी पीडितेने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. यावेळी काही ग्रामस्थ महिलेच्या मदतीसाठी धावून आले. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु पकृती गंभीर असल्याने सदर महिलेस अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी संगीता हनवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शंकर हनवते, सासू कमलाबाई रामजी हनवते यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. सदर घटनेचा तपास पोनि ए. डी. सुडके हे करीत आहेत.