हिंगोली : येथील बसस्थानकातील फलाटावर बहुतांश बसेस व्यवस्थित लावल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागताे. योग्य फलाटावर बस लावल्यास ती कुठे चालली हे लवकर कळते, असेही प्रवाशांनी सांगितले.
गत काही महिन्यांपासून हिंगोली बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आगाराने बसस्थानकाची उभारणी केली आहे. पत्राचे शेड उभारुन कंट्रोल रुम व प्रवाशांसाठी बसण्यासाठी सोय केली. आजमितीस बसचालक फलाटावर गाडी न लावता इतर कुठेही बसेस उभ्या करत आहेत. त्यामुळे बस कुठे उभी राहिली, अन् काेठे जाणार हे कळत नाही. दुसरीकडे इतर बसेसही मध्येच येऊन उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अशावेळी खूप मनस्ताप त्रास सहन करावा लागतो. शौचालय आहे पण मोडक्या स्वरुपातले आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. अनेक वेळा सांगूनही आगाराने काही लक्ष दिले नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. सद्यस्थितीत प्रवाशांना बाहेरच्या हाॅटेलमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
प्रवाशांची प्रतिक्रिया...
बसस्थानकात अस्ताव्यस्त बसेस उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. बस कुठेही उभे केली जाते. बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. बसस्थानक प्रमुखांनी याची दखल घेऊन चालकांना सूचना दिल्यास प्रवाशांची धावपळ होणार नाही.
- आकाश इंगोले, प्रवासी
बसस्थानकाचे काम गत काही महिन्यांपासून रखडले गेले आहे. त्यामुळे आजमितीस चालक कुठेही अस्ताव्यस्तपणे बसेस लावत आहेत. बसस्थानकात बस कुठे उभी केली हे कळतच नाही. हिंगोली बसस्थानकात फलाटाची व्यवस्थाही केली नाही. फलाटाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- दीपक मगर, प्रवासी
प्रतिक्रिया
सद्यस्थितीत नवीन बसस्थानकाचे काम सुरु आहे. त्यामुळे फलाटाची व्यवस्था केेली नाही. नवीन बसस्थानक अद्ययावत असून ते लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानकाची निर्मिती केली असली तरी चालकांना बसेस व्यवस्थित लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. मालवाहू बस बस्थानकाच्या बाजूला लावल्या जात आहेत.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख
फोटो ४