वसमत (जि. हिंगोली) : वसमत बाजार समिती निवडणुकीत आ. राजू नवघरे यांच्यावर मतदारांची नाराजी दिसून येत होती; परंतु निवडणुकीत नवघरे यांनी राजकीय खेळी करत चलाखीने बाजार समितीवर पुन्हा सत्ता काबीज करत आपला दबदबा कायम ठेवला. दुसरीकडे निवडणुकीत माजी सभापती राजेश इंगोले यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करत अनेकांच्या हृदयात घर केले.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती १८ संचालकांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २५ डिसेंबर रोजी मतदान झाले, तर २६ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. यात १८ पैकी १३ जागांवर आ. राजू नवघरे यांच्या पॅनलने जिंकत बाजार समितीवर बहुमत सिद्ध केले, तर राजेश इंगोले यांच्या नेतृत्वातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत राजेश इंगोले यांनी लढत देत निवडणूक अटीतटीची केली होती. शेवटपर्यंत निकालाचे गणित कोणाच्याच लक्षात येत नव्हते.
निवडणुकीत आ. नवघरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रतिष्ठा पणाला लावीत राजकीय चलाखीने बाजार समितीवर सत्ता काबीज केली. कुरुंदा भागात नवघरे यांनी लक्ष केंद्रित करत या भागात मतदान जास्तीचे घेत विजय मिळवला. माजी सभापती राजेश इंगोले यांची जादू प्रथमच वसमत मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.