हिंगोली : काल विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असलेले कळमनुरीचे आ.संतोष बांगर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी भूमिका बदलली. एवढे नाट्य घडून गेल्यानंतर अचानक बांगर यांचा शिंदेवरील विश्वास दृढ झाल्याने मतदारसंघातही आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळ्या दिशेने गेले असतानाही आ.संतोष बांगर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळीही त्यांनी ठाकरे गटाशीच प्रामाणिकता दाखविली. सोमवारी सकाळीच त्यांनी शिवसेनेच्या गटाशी फारकत घेत अचानक शिंदे यांच्या गटाशी घरोबा केला. ते शिवसेनेत सामिल झाले.
ढसाढसा रडले होते बांगरशिवसेनेचे आमदार गुवाहाटीत असताना त्यांना पुन्हा शिवसेनेत परत या असे आवाहन करीत आ.संतोष बांगर हे ढसाढसा रडले होते. शिवसेना सोडणाऱ्यांवर पुन्हा गुलाल पडला नसल्याचे सुतोवाचही त्यांनी केले होते.
बायकाही पळून जातील म्हटल्याने चर्चेतशिवसेनेत बंडखोरी होऊ नये, शिवसेना एकत्रित राहावी, यासाठी आ.संतोष बांगर यांनी जिल्हाभर दौरा केला. वसमत येथे त्यांनी जोशपूर्ण भाषण करताना शिवसेनेतून पळून गेलेल्या आमदारांच्या बायकाही पळून जातील. त्यांची मुले मुंजी राहतील, त्यांची लग्ने होणार नाहीत, असे म्हटले होते. त्यामुळेही ते चर्चेत आले होते.
हिंगोलीत सेनेचे एकमेव आमदारआ.संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यामुळे तेही शिंदे गटात गेल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही आमदार उरला नाही. त्यांच्यासोबत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम हेही शिंदे गटात गेले. मात्र उर्वरित पदाधिकारी काय भूमिका घेतात? हे अजून स्पष्ट नाही.