कळमनुरी (हिंगोली): राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेकदा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते आमने सामने आले आहेत. यातच नेहमीच चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेरच त्यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. यावेळी संतोष बांगर यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावली.
शिंदे गटात गेल्यापासून आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याने चर्चेत असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे दरवर्षी मसाई मातेची यात्रा भरते. या यात्रेत भाविकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. पण, आज शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यात्रेत हजेरी लावली. पण, यावेळी गावकऱ्यांनी त्यांना गावात प्रवेश दिला नाही. त्यावेळी, त्यांचे समर्थक आणि गावकरी एकमेकांसोबत शाब्दीकरित्या भिडले. यावेळी, समर्थकाडून ग्रामस्थांना विरोध करण्यात आल्यानंतर, आमदार बांगर यांनी समर्थकाच्या कानशिलात लगावली. आमदार बांगरा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे, पुन्हा एकदा त्यांच्या मारहाणीची चर्चा होत आहे.
वारंगा मसाई यात्रेची मोठी परंपरा
शेकडो वर्षांपासून ही यात्रा या गावांमध्ये भरते. यात्रेनिमित्त या गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे सहभागी होत असतात. यंदा ही यात्रा 7 जानेवारी रोजी भरली आहे. ग्रामस्थांनी आमदार बांगर यांना मंदिराच्या अलीकडेच रोखले आणि आज देवीच्या दर्शनासाठी येऊ नका, यात्रा झाल्यानंतर या असे सांगितले. यावेळी गावच्या यात्रेत राजकारण नको म्हणत शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आणि आमदार बांगर यांना दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आलं.