हिंगोली : अवैध वाळू उपसा व वाहतुकीबाबत आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तक्रार दिल्यानंतर चौकी उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रत्यक्षात अंमल मात्र नाही. त्यामुळे यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा कहर झाला आहे. मटका, वाळू यावरून रान पेटविले जात आहे. या सर्व बाबींची तक्रार आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी प्रशासनाकडे केली होती. मटक्याबाबत आता त्यांची काय भूमिका आहे माहिती नाही, मात्र अवैध वाळू उपसा रोखण्याचे त्यांनी मनावर घेतल्याचे दिसत आहे.
महसूल व पोलिसांवर ठपकाआमदार मुटकुळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, महसूल व पोलिस प्रशासनाच्या दर्लक्षामुळे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. सर्वसामान्यांसह बांधकाम करणाऱ्या प्रत्येकालाच चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. वाळू घाटावरून मंजूर साठ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाळूचा उपसा होत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही काहीच फायदा होत नाही. २२ फेब्रुवारीपर्यंत याविरोधात कडक कारवाई अन्यथा २३ फेब्रुवारी रोजी सहकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
राजकीय वादातून विषय पेटलामागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्याचा भडका उडणार असल्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. यामुळेच अवैध वाळू उपसा रोखण्याच्या प्रयत्नांना गती आली. अवाजवी दराने वाळू विकत घ्यावी लागत असल्याची ओरड अनेक दिवसांची होती. मात्र ती दुर्लक्षित होती. मुटकुळे यांनीच आवाज बुलंद केल्याने स्वस्तात वाळू मिळण्याच्या सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सत्ताधारी आमदारास आंदोलन केले तर ही नामुष्कीची बाब ठरणार आहे.