औंढा नागनाथ ( जि.हिंगोली ) : मशिदीत का जमला म्हणून एकाच्या मोबाईलवर वारंवार फोन करून शिवीगाळ केली जात असल्याच्या तक्रारीवर पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत औंढा पोलीस ठाण्यावरच हल्ला करण्याचा प्रकार शनिवारी दुपारी १२ वाजता घडला. बचावासाठी पोलिसांनी हवेत दोनदा गोळीबार केली असून अधिकाऱ्यांसह सात ते आठ पोलीस कर्मचारीही दगडफेकीत जखमी झाले.
दोन ते तीन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाला डिवचणारे भ्रमणध्वनीवरून कॉल आल्याने याबाबत औंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. यावरून पोलीस प्रशासन तपासही करीत होते. हा क्रमांक नेमका कुणाचा आहे, कशामुळे हा प्रकार घडतोय, याची चौकशीही सुरू होती. मात्र हा क्रमांक बंद असल्याने त्यात व्यत्यय येत होता. दरम्यान, काल रमजान ईद झाल्यानंतर आज दीडशे ते दोनशे जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून गेला होता. त्यांनी या प्रकरणाची चौकशी का होत नाही, या कारणावरून पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरूनच ठाण्यावर दगडफेक सुरू केली.
जमाव तयारीनेच आल्याने मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली. पोलिसांचे काही एक न ऐकता ही दगडफेक सुरूच होती. हा जमाव ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी दोनदा गोळीबार केला. त्यानंतर जमाव पांगला. मिळेल त्या दिशेने हे लोक पळू लागले. त्यामुळे त्यांनी आणलेल्या दुचाकी जागीच सोडून दिल्या. अशा तीस ते पस्तीस दुचाकीही नंतर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे यांच्यासह जिल्ह्यातील इतर ठाण्यातून आलेले अधिकारी जमले. औंढा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या औंढ्याला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
दोन अधिकारी व आठ कर्मचारी जखमीपोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्यासह इतर सात ते आठ कर्मचारी या दगडफेकीत जखमी झाले आहेत. यातील काही जणांनी चांगलीच दुखापत झाली आहे. या जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या परिसरात दगडांचा खच जमा झाल्याचे पहायला मिळाले.
सात ते आठ जणांना अटकया प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी औंढ्यात दाखल होताच या ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या घटनेत दगडफेक करणाऱ्या सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजूनही धरपकड मोहीम सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींवरूनही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.