हिंगोली : घरकाम करण्यासाठी पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे १३ जुलै २०१६ रोजी दुपारी १ च्या सुमारास त्याच्या घरी घरकामासाठी राहायला आलेल्या अल्पवयीन पाहुणीचा सुनील संतोष ठाकरे (वय २४) याने विनयभंग केला. यामुळे पीडितेने स्वत:चा व आईवडिलांचा अपमान झाल्यामुळे तिच्या आजोबांच्या घरी विषारी औषध प्राशन केले. याबाबत पीडितेच्या मावशीने सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. यात तपासी अंमलदार व्ही.बी. विरणक यांनी गुन्ह्याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणास विशेष बाल खटला म्हणून चालविले. यात एकूण सहा साक्षीदार तपासले. पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी व इतर पुराव्यांसह परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून २५ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी निकाल दिला. यात आरोपी सुनील ठाकरे यास क. ८ (बा.लैं.अ.प्र.का.) अधिनियम २०१२ नुसार दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा, कलम ४५१ भादंविनुसार दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंड वसूल झाल्यानंतर व अपील कालावधी संपल्यानंतर पीडितेला १५ हजारांची नुकसानभरपाई देण्याची तरतूदही ठेवली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सविता देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एस.डी.कुटे, ॲड. एन.एस. मुटकुळे, कोर्ट पैरवी टी.एस. गोहाडे, एस.जी. बलखंडे यांनी सहकार्य केले.