हिंगोली : कधी पावसाची दडी तर कधी अतिवृष्टी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. रात्रंदिवस पिकांची राखण करूनही पिकांचे संरक्षण करणे शक्य होत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. बोराळा शिवारातील शेतकऱ्यांचा मूग वानरांसह हरीण, निलगायींनी खाल्ल्यामुळे शेतात केवळ काड शिल्लक राहिले. तर, दुसरीकडे मात्र वन विभाग तक्रारी करूनही प्राण्यांचा बंदोबस्त करत नसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी, पांगरी, बोराळा, थोरजवळा, बोराळवाडी या भागात वानरं, हरीण, निलगायी, रानडुकरांचा वावर वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास तीन ते चार पटीने वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन भरात असलेली पिके प्राणी फस्त करीत आहेत. तसेच अनेक वेळा प्राणी पिकातून सैरावैरा पळत असल्यामुळे नासाडी होत आहे. या भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिके समाधानकारक स्थितीत आहेत. परंतु, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.बोराळा येथील शेतकरी विजय वाबळे, बद्री वाबळे, गजानन वाबळे यांनी आपल्या शेतात पेरलेल्या मुगाच्या शेंगा वानरांनी फस्त केल्या. फुले, कोवळ्या शेंगा खाल्ल्यामुळे शेतात केवळ काडंच राहिले. काडं ठेवून तरी काय करावे म्हणून शेतकऱ्यांना ऐन भरात असलेला मूग उपटून फेकावा लागला. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
प्राण्यांचा बंदोबस्त होईना...यंदा खरिपाच्या प्रारंभापासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. ऐन भरात असलेल्या पिकांची प्राणी नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.