कळमनुरी : /दरवर्षी /मार्च महिना लागला की शाळा या 'फुल डे' ऐवजी 'हाफ डे' होतात; परंतु यावर्षी मार्च महिना लागूनही शाळा पूर्णवेळ भरत आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर पसरला आहे. कित्येक दिवसांपासून मार्च महिना लागला की शाळा अर्धवेळ दुपारपर्यंत भरविल्या जाते. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने मागील १५ ते २0 दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. तसेच अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. काही शाळेतही तीच गत आहे. एकीकडे पाण्याची समस्या तर दुसरीकडे उकाडा अशा अवस्थेतच विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्णवेळ भरत आहेत. मार्च महिन्यात पूर्णवेळ शाळा का भरत आहे? असा सवाल काही पालक शिक्षकांना करत आहेत. आम्हाला वरिष्ठांनीच सांगितले की, पूर्णवेळ शाळा करा, असे उत्तर शिक्षक देत आहेत. या दोन दिवसांत ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला; परंतु दुपारच्या वेळेला उकाडा चांगलाच जाणवत आहे. या महिन्यात विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टय़ांची मजाही हिरावून घेतल्या गेली आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, उर्वरित वर्गाच्या परीक्षा या महिन्याअखेर व एप्रिल महिन्यात होतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी मार्च महिन्यात हाफडे शाळा भरविली जाते. परंतु यावर्षी मार्च महिन्यातही पूर्णशाळा भरत आहे. मार्च महिन्यात पूर्णवेळ शाळा का भरत आहे, असे विस्तार अधिकारी एस. बी. सोनुने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला शिक्षणाधिकार्यांनी पूर्णवेळ शाळा करण्यासाठी सांगितले आहे. मार्च महिन्यात अर्धवेळ शाळा करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. /(वार्ताहर)
मार्च महिन्यातही 'फुल डे' शाळा भरतेय
By admin | Published: March 04, 2015 3:42 PM