हिंगोली : कोरोनाआधी सर्वच रेल्वेंना मासिक पास दिली जायची; परंतु कोरोनानंतर मात्र केवळ ‘डेमू’ रेल्वेलाच मासिक पास दिली जात असल्यामुळे प्रवाशांतून नाराजीचा सूर आहे.
रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या अजूनही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ‘डेमू’ने प्रवाशांना शहराच्या ठिकाणी यावे लागत आहे. ‘डेमू’ रेल्वे सुरू केली असून भाडे मात्र एक्स्प्रेसचे घेतले जात आहे. त्यामुळे मासिक पासही परवडेना झाली आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे...
नरखेड ते काचीगुडा
तिरुपती ते अमरावती
अजमेर ते हैदराबाद
जयपूर ते सिकंदराबाद
नागपूर ते कोल्हापूर
बिकानेर ते नांदेड
इतर रेल्वेना का नाही सवलत?
कोरोनाआधी सर्वच रेल्वेंला मासिक पासची व्यवस्था होती. त्यामुळे कोणत्याही वेळी शहराच्या ठिकाणी येणे सोपे होत होते. यामुळे व्यापाऱ्यांना ते सोयीचे जात होते; परंतु हल्ली ‘डेमू’ रेल्वेलाच पासची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डेमू रेल्वे पॅसेंजर रेल्वे म्हणून असली तरी भाडे मात्र एक्स्प्रेसचे घेतले जात आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी पॅसेंजर रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे.
भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
रेल्वे विभागाकडे वेळोवेळी पॅसेंजर रेल्वेची मागणी करूनही ‘पॅसेंजर’ रेल्वे सुरू केली जात नाही. ‘डेमू’ला एक्स्प्रेसचे भाडे घेतले जात आहे. त्यामुळे प्रवास करणे कठीण होऊन बसत आहे.
-ज्ञानेश्वर कल्याणकर, प्रवासी
प्रवाशांनी मागणी केल्यानंतर पॅसेंजर रेल्वे म्हणून ‘डेमू’ रेल्वे सुरू केली आहे; परंतु या डेमू रेल्वेची पासही परवडत नाही. सर्वच रेल्वेला पासची व्यवस्था सुरू केल्यास शहराच्या ठिकाणी जाणे सोपे होईल.
-ज्ञानेश्वर शिंदे, प्रवासी
रेल्वेचा प्रवास सुखकर आहे म्हणून अनेक जण रेल्वेने प्रवास करतात; परंतु रेल्वे विभाग प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत अहे. रेल्वे विभागाने ‘डेमू’ रेल्वेप्रमाणे इतर रेल्वेलाही पासची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
-गोलू बोरकर, प्रवासी
प्रतिक्रिया
रेल्वे विभागाच्या सूचनेवरून ‘डेमू’ रेल्वेला पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतर रेल्वेबाबत अजून तरी सूचना नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्यास इतर रेल्वेलाही पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता कोरोनाचे नियम प्रवाशांनी पाळावेत.
-रामसिंग मीना, रेल्वे स्टेशन मास्टर