हिंगोली: कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वच जिल्ह्यात कंट्रोल रूम सुरू केले होते. या कंट्रोल रूममध्ये स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याने त्या तक्रारीचे निरसन केले पाहिजे, अशा सूचनाही दिल्या होत्या. मार्च ते मे या तीन महिन्यांत कंट्रोल रूमकडे जवळपास ३८ तक्रारी आल्या होत्या.
२३ मार्च २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला होता. त्यामुळे सर्वच ठिकाणची बाजारपेठ बंद होती. त्यामुळे मजूर, नोकरदारांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या होत्या. कोरोना महामारीमुळे अनेक जण त्राहीमाम झाले होते. या दरम्यान, नागरिक, रुग्ण, त्यांचे नातेवाईक व इतरांसाठी शासनाने जिल्ह्याच्या ठिकाणी कंट्रोल रूमची स्थापना केली होती. या दरम्यान, जास्त करून ‘बाजारपेठ कधी सुरू होणार’ याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. मार्च महिन्यात १६, एप्रिल महिन्यात १३ आणि मे महिन्यामध्ये ९ तक्रारी आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक बाजारपेठेच्या संदर्भातील होत्या. आरोग्याच्या संदर्भात या दरम्यान शासनाने एक पथक नेमले होते. यात उपजिल्हाधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला होता. त्यामुळे आरोग्याबाबत तक्रारी या पथकाकडे गेल्याचे कंट्रोलरूम येथून सांगण्यात आले.
तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी...
मार्च महिना १६
एप्रिल महिना १३
मे महिना ९
आरोग्यासाठी नेमले स्वतंत्र पथक...
कोरोना काळात जास्त करुन तक्रारी बाजारपेठ कधी सुरू होणार? बाजारपेठेची वेळ काय राहील? या संदर्भातील होत्या. आरोग्याच्या तक्रारीसाठी शासनाने स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. त्यामुळे आरोग्यसंदर्भातील तक्रारी कंट्रोल रूमकडे आलेल्या नाहीत.
कंट्रोल रूमकडे आलेल्या तक्रारी...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे मिळणार का? कधी मिळणार?
बाजारपेठेची वेळ निश्चित झाली का? केव्हा उघडणार बाजारपेठ?
बाजारपेठ बंद आहे. व्यावसाय बुडीत निघत आहे. काही तरी उपाययोजना आहे का?
कोरोनाने मृत्यू झालेल्यांना अनुदान आहे काय? तसा काही आपल्याकडे अर्ज आहे का?
कोणत्या वेळात बाजारपेठ उघडणार आहे, याची माहिती आहे का?
तीन महिन्यांमध्ये कंट्रोल रूमकडे आलेल्या सर्व तक्रारींचे योग्य प्रकारे निरसन केले आहे. सर्वांना शासनाने कोरोना संदर्भात घालून दिलेले नियम सांगितले. तक्रारकर्त्यांना योग्य दिशाही दिली. तुमचा संदेश संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पाठविला जाईल, असेही सांगितले. तीन महिन्यात जवळपास ३८ तक्रारी आल्या. यात जास्त करून ‘बाजारपेठ कधी सुरू होणार’ या होत्या.
- रोहित कंजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी