वसमत/हट्टा (जि. हिंगोली): कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. आईचे डोळे दुखत असल्यामुळे तिला परभणीच्या दवाखान्यात नेत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
३ एप्रिल रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेदरम्यान हट्टा येथून जवळ असलेल्या चिखली पाटी येथे कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. बुधवारी शिवाजी बालासाहेब भालेराव (वय ३०) व त्याची आई गयाबाई बालासाहेब भालेराव (वय ६५, दोघे रा. दारेफळ) हे वसमत तालुक्यातील दारेफळ येथून दुचाकी (क्र. एमएच ३८ एसी ७८६५) वरुन परभणीकडे जात होते. याच दरम्यान परभणीहून वसमतकडे कार (क्र. एमएच ३८ वी ३४५३) जात होती. दरम्यान दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरुन मुलगा व आईचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना समजताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, कृष्णा चव्हाण, गडगिळे, शेख असेफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघाताच होताच कारचालक फरार झाला असून पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. यानंतर कारचा मालक जगन गणपत ढोणे (रा. सावरखेडा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात होताच यावेळी दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करुन दिली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
आईचे डोळे तपासणीसाठी जात होते मायलेक...दोन महिन्यांपासून आईचे डोळे दुखत होते. त्यामुळे मुलाने आईला आज आपण परभणीच्या दवाखान्यात जावू आणि तिथे डोळे तपासून घेऊ असे सांगितले. परंतु काळाला आईचे डोळे तपासून घेणे मान्य नव्हते. क्रूर काळाने माय-लेकावर घाला घातला. या घटनेमुळे दारेफळ गावावर शोककळा पसरली आहे.