- गजानन वाखरकर
औंढा नागनाथ: जोरदार पावसामुळे हिंगोली रोडवरील नाल्याला पूर आला असताना दुचाकीने पुल पार करणे जीवघेणे ठरले ठरले आहे. जांभरून शिवारातील शेतातून भोसी गावात परताना दुचाकीवरील मायलेक पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात मुलगा बचावला असून आज सकाळी महिला शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला.
तालुक्यातील भोसी येथील महिला कोंडाबाई बाबुराव चिभडे (४९) मंगळवारी मुलगा मनोहर सोबत जांभरून शिवारातील शेतात गेल्या होत्या. तेथील कामे आटोपून दोघेही सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान दुचाकीवरून गावात परतत होत्या. दरम्यान, जोरदार पावसामुळे गावाजवळील नाल्याला अचानक पूर आला. पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून जात असताना दोघेही दुचाकीसह वाहून गेले. मुलगा मनोहर कसाबसा बाहेर आला. मात्र, कोंडाबाई पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्री शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नंदगाव तांडा शिवारात कोंडाबाई यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरगुडे, जमादार बापूराव चव्हाण, जमादार गजानन गिरी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.