हिंगोली : या जगात आईपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, परमेश्वरापेक्षाही आई मोठी आहे. तिन्ही जगावर तुमचे राज्य असले तरी आईविना माणूस भिकारीच असतो. आईच सुखाचा सागर आहे, असे मत नर्सी नामदेव येथे संगीत रामायण कथेत हभप रामराव महाराज ढोक यांनी २९ जानेवारी रोजी बोलताना व्यक्त केले.संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव असलेल्या नर्सी नामदेव येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणानिमित्त संगीत रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत रामकथा पार पडते. यावेळी पुढे बोलताना हभप ढोक महाराज म्हणाले की, संस्काराने हिंदुस्थान देश सर्वसंपन्न आहे. ढोक महाराज म्हणाले, प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना आयोध्येतील प्रजा रडत होती ते ठिक आहे पण; त्या ठिकाणी असलेले जनावरेही रडत होती. अगदी असेच गोपाल श्रीकृष्ण जात असताना पद्मगंधा नावाची गाय ढसाढसा रडली होती आणि श्रीकृष्णाच्या विरहात तिने चारा-पाणी सोडले होते, हे या देशातील संस्कार आहेत. आईची महती सांगताना ढोक महाराज म्हणाले की, आई सुखाचा सागर असून ज्याला आई आहे, तो भाग्यवान आहे. तुमच्याकडे वैभव किती आहे याला काही अर्थ नाही. आई नसेल तर तो भिकारीच असतो. स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी अशी आईची महती आहे. मुलगा कसाही असला तरी आईला तो प्रिय असतो. म्हणूनच परमेश्वरापेक्षाही आई मोठी आहे.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:51 AM