हिंगोली- केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम आता आयटीआयमध्ये विलीन केला जाणार आहे. याचा फटका अभ्यासक्रम चालविणारी सहा महाविद्यालये व जवळपास ३५० विद्यार्थ्यांना बसणार आहे.
विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारक्षम करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत किमान कौशल्यावर आधारित इयत्ता ११ वी आणि १२ वी स्तरावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील ३२ वर्षापासून शासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित तत्वावर संस्थाद्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो. परंतु, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्रालयाने या योजनेला गुंडाळण्याचा घाट घातला आहे. सदर अभ्यासक्रम बंद करून यातील विद्यार्थी, शिक्षकांना आयटीआयमध्ये विलीनिकरण करण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात एका पथकाने याची चाचपणीही केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
संस्थाचालकांच्या प्रतिक्रीया
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम हा आयटीआयला जोडण्यास हरकत नाही. मात्र आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे. अभ्यासक्रम बंद झाल्यास संस्था, प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
- के.एस. शिंदे, सचिव, बाराशिव शिक्षण संस्था
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद झाल्यास हा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापकांना आयटीआयमध्ये शिल्प निदेशक म्हणून घेतले जाणार आहे. एमएससी कृषी पदवी असणाऱ्या प्राध्यापकांना आयटीआयमध्ये कसे अध्यापन करता येाणर. यात विद्यार्थ्यांचेही नुकसान होईल.
-गजानन असोले, जिल्हाध्यक्ष जुक्टा संघटना.
११ वी , १२ वी ला व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड करणारे विद्यार्थी व्यवसायसह शालेय शिक्षण अनुभवता यावे, यासाठी प्रवेश घेतात. आता आयटीआयमध्ये प्रवेश विलीनीकरण झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
- ज्ञानेश्वर आठवले, विद्यार्थी
प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे. ज्या अभ्यासक्रमात आवड आहे, तो अभ्यासक्रम निवडण्याकडे कल असतो. त्यामुळेच कला, विज्ञान शाखे ऐवजी व्यवसाय अभ्यासक्रम निवडला आहे. आता आयटीआयमध्ये विलीनीकरण झाल्यास नुकसानच होणार आहे.
-मनोज भोजे, विद्यार्थी
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील संस्था
शासकीय - १
अनुदानित- ४
कायम विनाअनुदानित-१
प्रवेश क्षमता -३० (प्रत्येक तुकडी)