- विजय पाटील
हिंगोली : पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीचे उमेदवार खा.हेमंत पाटील यांना आपल्याला निवडून आणायचे आहे, असे वक्तव्य हिंगोलीतील शिंदे गटाच्या मेळाव्यात आ.संतोष बांगर यांनी केले. त्यामुळे खा.हेमंत पाटील हेही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पाटील यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच माझ्याबाबत काय तो निर्णय घेतील, असे सांगितले.
हिंगोली येथील या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या बैठकीबाबतचे संदेश फिरल्यानंतर शुक्रवारी रात्री शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी या बैठकीला जाऊ नये, असे आवाहन केले होते. मात्र तरीही कळमनुरी विधानसभेतील अनेकजण बैठकीला दिसले. अनेकांनी दांडी मारली. हिंगोलीतील काही नगरसेवकांचीही हजेरी होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ती आणि ही अशी वेगळी शिवसेना नाही. आम्ही एकच आहोत, असे आ.बांगर म्हणाले. तसेच मीच जिल्हाप्रमुख आहे आणि तेही आपलेच शिवसैनिक आहेत. कुणाचाच राग मानू नका, असेही त्यांनी म्हटले. आगामी आठ दिवसांत ते आपलेच होतील, असेही सांगून त्यांनी बुचकळ्यात टाकले.
या भाषणाच्या आवेशात मात्र त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा.हेमंत पाटील हेच भाजप व शिवसेना युतीचे उमेदवार असतील हे छातीठोकपणे सांगितले. एवढेच नव्हे, तर तीन ते चार वेळा त्याचा उल्लेख करून त्यांनी साडेतीन नव्हे, तर पाच लाख मतांनी निवडून आणायचे असल्याचेही ते म्हणाले. खा. पाटील हे अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहेत. मात्र त्यांचे नाव येथे आल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला.
माझ्याबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेणारयाबाबत विचारले असता खा.हेमंत पाटील म्हणाले, मी सध्या किनवट भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत फिरत आहे. लोकसभा अजून लांब आहे. माझ्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे कोणी काय म्हटले, यावरून संभ्रम नको. तर राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मु यांना पाठिंबा देण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र १८ रोजी आम्ही नेमक्या कोणत्या बैठकीला उपस्थित राहायचे ते ठरणार आहे. पक्षप्रमुखच त्याबाबत आदेश देतील, असेही ते म्हणाले.