हिंगोली : हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने २००९ पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना हा पुरस्कार देण्यात येतो. खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत केली जाते.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.सातवांनी ८१ टक्के उपस्थिती लावत ११७ वेळा चर्चेची सुरुवात, ८८ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकीत व अतांराकीत असे १०७५ प्रश्न उपस्थित करुन २३ खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा.राजीव सातव यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.
तामिळनाडू येथील राजभवनात येत्या १९ जानेवारी रोजी ही पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. या पारितोषक वितरण सोहळ्यास तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री पी.पी चौधरी, आयआयटी मद्रासचे संचालक डॉ.भास्कर राममूर्ती, प्राईम पाइंटचे अध्यक्ष के.श्रीनिवास आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
देशात खा.सातव दुसऱ्या क्रमांकावरलोकसभेतील ५४३ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात हिंगोलीचे खा.राजीव सातव देशात आपल्या अष्टपैलू कामगिरीवरून दुसऱ्या क्रमांकावर असुन, सातव यांना १२१५ अंक मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर १२७२ अंक मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे तर तिसऱ्या क्रमांकावर १२११ अंक मिळवून शिवसेनेचे खा.श्रीरंगअप्पा बारणे आहेत.