- अरुण चव्हाणजवळाबाजार : शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करून लेकरांना शिकवले. त्या कष्टाचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया अल्पभूधारक शेतकरी सदाशिवराव कदम यांनी दिली. गावात आनंदाची वार्ता कळताच ग्रामस्थांनी पेढे वाटले.
संतोष सदाशिवराव कदम याचे प्राथमिक शिक्षण करंजाळा व माध्यमिक शिक्षण निवासी हायस्कूल, बाराशिव येथे झाले. त्यानंतरचे उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षेची तयारी संतोषने पुणे येथे करणे सुरू केले. गत दोन वर्षांपासून संतोष स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला मोठा माणूस व्हायचे आहे, असे संतोष नेहमीच सांगत असे. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे मी फौजदार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. आई-वडिलांनी शेतीमध्ये काबाडकष्ट करून मला शिक्षण दिले, हे सांगत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले, असेही संतोषाने सत्काराला उत्तर देताना सांगितले. करंजाळासारख्या ग्रामीण भागातून उच्चशिक्षित होण्याचा मान मला आई-वडिलांमुळेच मिळाल्याचे संतोष कदम याने सांगितले.
गावकरी सत्कारावेळी गहिवरले...संतोष कदम याची फौजदारपदी निवड होताच गावोगावचे ग्रामस्थ सत्काराचा कार्यक्रम आखत आहेत. जो-तो सत्काराची तयारी करत असून, परिसरातील करंजाळा, तपोवन, जवळाबाजार, बाराशिव, आडगाव, वसमत अशा विविध ठिकाणी झालेल्या सत्कार कार्यक्रमांत गावकरी गहिवरून जात आहेत. हट्टा पोलिस ठाण्यातर्फे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे व पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी संतोष कदमचा सत्कार केला.