डोंगरकडा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील महावितरणच्या कारभाराला कंटाळून येथील ग्रामस्थांनी कार्यालयात बसलेल्या वीजकर्मचाऱ्यांना शनिवारी दुपारी १२ वाजता कोंडले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ग्रामस्थांनी त्यांना सोडले नव्हते. याठिकाणी पाेलिसांसह ग्रामस्थांची माेठ्या संख्येने गर्दी जमली हाेती. ( MSEDCL employees locked in office by villagers; Anger expressed by irregular power supply n Hingoli )
डाेंगरकडा परिसरातील डोंगरकडा फाटा, भाटेगाव, वरुड, हिवरा गावातील वीजपुरवठा रात्री - अपरात्री सतत पाच - दहा मिनिटाला खंडित होत हाेता. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक हाेत, डोंगरकडा येथील वीजवितरण कार्यालयात असलेले कनिष्ठ अभियंता प्रकाश जाधव यांच्यासह लाईनमन यांना १० जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यालयाला कुलूप लावून काेंडले आहे. सततचे भारनियमन, अनियमित वीजपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्यांनी यापूर्वीही महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत हे प्रकार थांबविण्याची मागणी केली हाेती. परंतु पाच- पाच मिनिटाला वीजसेवेचा खेळखंडोबा होत असल्याने, ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रात्रीला खंडीत हाेत असलेला वीजपुरवठा यामुळे उकाडा जाणवत आहे. पाऊस नसल्याने अनेकांना पिकांना पाणी देण्यास अडचण हाेत हाेती. यासह अनियमितेच्या कारभाराविरूध संतप्त हाेत १७ मे रोजी याच कारणावरून अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये डांबून ठेवले होते.
याघटनेला दाेन महिने हाेत नाहीत, ताेच वीजवितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत वीजपुरवठा कामात सुधारणा केली नाही. तसेच डोंगरकडा, हिवरा फिडर वेगवेगळे करा, डोंगरकडा फाटा इरिगेशनचे रोहित्र चालू करावे, कार्यालयामधील लाईनमन हे आपल्या सोयीच्या ठिकाणावरून ये- जा करतात. यापैकी एकही अधिकारी किंवा कर्मचारी हे मुख्यालयी राहत नाहीत यासह अनेक समस्यांची साेडवून हाेत नसल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी डोंगरकडा येथील वीज वितरणच्या कार्यालयाला कुलूप लावत कर्मचारी व अधिकाऱ्यांना काेंडले. सांयकाळी ५ वाजेपर्यंत त्यांना साेडण्यात आले नव्हते. याप्रसंगी पप्पू अडकीने, विजय गावंडे, अशोक अडकीने, डॉ. सुधाकर लोमटे, यशवंत पंडित, उध्दव गावंडे, जनार्धन गावंडे, रविकुमार पंडित, शेख जावेद, गंगाधर अडकीने, किशनराव गावंडे, पप्पू व्यवहारे, संजय अडकीने, गजानन गावंडे यांच्यासह भाटेगाव, वरुड, हिवरा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, बापूराव बाभळे, प्रभाकर भोंग यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.