हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असताना म्युकरमायकोसिस आजारानेही शिरकाव केला होता. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनही हतबल झाले होते. मात्र, योग्य उपचाराने सर्वच रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले असून, एकाही रुग्णाला जीव गमवावा लागला नाही. सध्या एकही रुग्ण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व यंत्रणेला कामाला लावले होते. दररोज रुग्ण आढळून येत असल्याने कोरोना केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल झाले होते. एकीकडे कोरोना रुग्ण बरे करण्यात आरोग्य विभागाची कसरत सुरू असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात शिरकाव केला होता. त्यामुळे आरोग्य विभागाची दुहेरी कसरत सुरू होती. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १६ रुग्ण आढळून आले होते. मात्र, वेळीच त्यांच्यावर योग्य उपचार केल्याने १६ रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी आठ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली, तर एका गंभीर रुग्णाला नांदेड येथे हलविण्यात आले होते. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर लागला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण सध्या दाखल नाही.
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिस आजार दुर्मीळ असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिस होतो. डोळ्याखाली, तोंडात टाळूला, गालाखाली सूज येणे, दात ठिसूळ होणे ही प्राथमिक लक्षणे या आजाराची असल्याचे डॉ. फैसल खान यांनी सांगितले.
औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असताना मेच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातच इंजेक्शन व औषधी उपलब्ध होती. खाजगीमध्ये ही औषधी मिळत नव्हती. जिल्हा रुग्णालयाने औषधी व इंजेक्शनची मागणी केल्यानंतर मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली. सध्या जिल्ह्यात इंजेक्शन व औषधी मुबलक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, गंभीर रुग्ण असल्यास एका रुग्णाला किमान चार आठवडे इंजेक्शन द्यावे लागते.
आठ जणांवर शस्त्रक्रिया
म्युकरमायकोसिसचा शरीरात संसर्ग लवकर होतो. त्यामुळे हा संसर्ग डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पाेहोचण्याची शक्यता असते. यातून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे प्राण वाचतात. अनेकवेळा संसर्ग जास्त झाल्यास डोळाही काढावा लागतो. सुदैवाने जिल्ह्यात एकाही रुग्णांचा डोळा काढून टाकण्याची गरज भासली नाही. केवळ फंगस काढण्यासाठी आठ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली.
ही घ्या काळजी
म्युकरमायकोसिस आजार होऊ नये, यासाठी प्रत्येकाने एकच मास्क आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस वापरू नये. तसेच मधुमेह नियंत्रणात राहील, याची काळजी घेतल्यास या आजारापासून बचाव करता येऊ शकतो.
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. मधुमेह व इतर गंभीर आजार असलेल्यांनी एकदा तरी मुख आरोग्य तपासणी करावी, म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. फैसल सलीम खान, ओरल ॲण्ड मॅक्झिलोफेसिएल सर्जन, हिंगोली