हिंगोली : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
गत वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आता कुठे दोन दिवसांपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडतो. परंतु, यावेळेस ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. दोन दिवसांपासून मात्र चांगला पाऊस पडत आहे. नवीन बसस्थानकाचे काम काही तांत्रिक कारणामुळे रखडल्यामुळे जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवाशांसाठी काही महिन्यांपूर्वी शेड उभारून दिला आहे. परंतु, संततधार पावसामुळे या ठिकाणी बसणे आता कठीण होऊन बसले आहे. प्रवासी पावसात भीजू नयेत म्हणून एस.टी. महामंडळाने नवीन बसस्थानक खुले करून दिले आहे. सद्य:स्थितीत बसस्थानकात पाणी आणि चिखल झाला असून, एस.टी. मध्ये चढताना मात्र प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नवीन बसस्थानकातही मोकाट जनावरांचा ठिय्या....
दोन दिवसांपासून संततधार असल्यामुळे महामंडळाने प्रवाशांची व्यवस्था नवीन बसस्थानकात केली आहे. परंतु, तेथेही मोकाट जनावरांनी ठाण मांडले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महिनापूर्वी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नगर परिषदेकडे केली होती. परंतु अजून तरी मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही. मोकाट जनावरांमुळे प्रवाशांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
फोटो ४