हिंगोली: रविवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील बसस्थानकात पाणीच पाणी झाले आहे. बसस्थानकात बसायला जागा नसल्यामुळे चिखलात उभे राहून प्रवाशांना बसची वाट पाहत बसावे लागत आहे.
दोन-अडीच आठवड्यांपासून पावसाने दडी मारली होती. ११ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली, शहरातील छोटे-मोठे नालेही पावासाच्या पाण्यामुळे भरुन वाहत होते. शहरातील बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. नवीन बसस्थानकाचे काम सुरु असल्यामुळे पत्राचे शेड टाकून साध्या पद्धतीने बसण्यासाठी प्रवाशांसाठी निवारा करुन दिला आहे. परंतु, उन्हाळ्यात या ठिकाणी धूळ आणि पावसाळ्यात पाण्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बसस्थानकातील गिट्टी, माती उखडली गेली असून चालकाला साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, याबाबत अनेक वेळा आगारप्रमुखांना सांगितले गेले आहे. परंतु, पावसाळा सुरु झाला तरी आगारप्रमुखांनी लक्ष दिले नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
चालक-वाहकांच्या विश्रामगृहात पाणी...
बसस्थानकात मुक्कामी राहण्यासाठी पर जिल्ह्यांतून अनेक चालक-वाहक रोज येत असतात. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून चालक-वाहकांना विश्रांती घेण्यासाठी येथे जागाही शिल्लक राहिली नाही. विश्रामगृहात पावसाचे पाणी साचले असून कचऱ्याचे ढिगही मोठ्या प्रमाणात आहेत. अशावेळी मुक्कामी आलेल्या चालक-वाहकांनी कुठे रहावे? कशी विश्रांती घ्यावी? हा प्रश्न आहे. पावसाच्या पाण्यामुळे चालक-वाहकांना रात्र जागून काढावी लागली. आगारप्रमुखांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी चालक-वाहकांनी केली आहे.
फोटो (सुनील पाठक)