कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. अजूनही बऱ्याच भागातील रेल्वे सेवा बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंगोली जिल्हा हा दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतो. या भागातील नागरिक शासकीय आणि मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबई, औरंगाबाद ये-जा करत असतात. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-हिंगोली-पूर्ण रेल्वे मार्गावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईकडे जाणारी एकही रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे हिंगोली, वसमत आणि वाशिम येथील प्रवासी नागरिकांची कित्येक वर्षांपासून मोठी गैरसोय होत आहे. पण आता यावर लवकरात लवकर तोडगा काढून मुंबई-जालना जनशताब्दी ही रेल्वेगाडी हिंगोली किंवा वाशिमपर्यंत चालवण्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांच्याकडे केली.
ही रेल्वेगाडी १२ तास जालना येथे उभी असते. तो वेळ वापरून गाडी पुढे चालवावी, असे तंत्रशुद्ध कारण खा. पाटील यांनी रेल्वे समितीला पटवून दिले. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वेकडून कार्यवाही होऊन ही मागणी पूर्ण होईल आणि हिंगोलीवासीयांना मुंबईकडे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल, असेही खा. पाटील म्हणाले. अकोला-पूर्णा-हिंगोली-वसमत मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत रेल्वे विभागाशी अनेकवेळा मागणी करूनही कारवाई होत नसल्याचे खा. पाटील म्हणाले.
सध्या नांदेडवरून मुंबईकरिता रेल्वे सुरू आहेत, पण हिंगोली जिल्ह्याच्या भागातून रेल्वे सेवा सुरू नाहीत. त्यामुळेच सध्या जनशताब्दी एक्सप्रेस जालना ते मुंबई दरम्यान दररोज धावते. ही रेल्वेगाडी सकाळी ८ वाजता मुंबईकरिता निघते आणि रात्री पावणे आठच्या सुमारास जालन्यात येऊन १२ तास थांबते. त्यामुळे त्या गाडीला जालन्याऐवजी हिंगोली किंवा वाशिमपर्यंत वाढविण्यात आल्यास या भागातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाना सोयीचे ठरणार आहे. तसेच यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल. या सर्व बाबी लक्षात घेता यावर विचार करण्यात यावा. या बैठकीत खा. हेमंत पाटील यांनी देशातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प तत्काळ पूर्ण करावेत, नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, हिंगोली येथे रेल्वेच्या मोकळ्या जागेत वेअर हाऊस बांधण्यात यावे आदी प्रश्न मांडले.
बैठकीला सदस्य संजीव मित्तल, राहुल जैन, एस.के. मोहंती, मुकेश निगम, राहुल अग्रवाल, संजय रस्तोगी, आर. एन. सिंघ आदी उपस्थित होते.