औंढा नागनाथ : तालुक्यातील सळणा येथे भर रस्त्यात बसस्थानक परिसरात पुंडलिक ततेराव कुटे (५६ ) यांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येच्या या घटनेतील मुख्य आरोपी व इतर तिघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सळणा येथील पुंडलिक कुटे आणि दराडे कुटूंबात शेतीच्या कारणावरून जुना वाद आहे. यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. शुक्रवारी सुद्धा दोन्ही कुटुंबात काही कारणावरून वाद उफाळून आला. दरम्यान, नांदेड-औरंगाबाद महामार्गावरील बसस्थानकावर पुंडलिक कुटे व विठ्ठल दराडे यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी विठ्ठल आणि आणखी तिघांनी मिळून पुंडलिक यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. वार तीक्ष्ण आणि अधिक खोलवर असल्याने कुटे रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच कोसळले.
याची माहिती कुटे यांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी पोलिसांनी माहिती देत घटनास्थळ गाठले. यानंतर पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, सपोनि शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत कुटे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, हत्येतील मुख्य आरोपी विठ्ठल दराडे याच्यासह इतर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.