हिंगोली : शहरालगतच्या गारमाळ भागातील एकाची जीप भाड्याने नेऊन जीपचालकाचा खून केल्याची घटना किल्लारी (जि. लातूर) पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली होती. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी पहाटे तिघांना ताब्यात घेतले आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदान येथून ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिघांनी गारमाळ येथील युसूफ नौरंगाबादी यांची गाडी भाड्याने घेतली. त्यानंतर ही गाडी परभणी, गंगाखेड, अंबेजोगाईमार्गे लातूर रोडने किल्लारी पोलीस ठाणे हद्दीतील चुलबुर्गा भागात गेली. मात्र, प्रवासादरम्यान तिघांनी चालक युसूफ नौरंगाबादी यांचा गळा आवळून खून केला तसेच मृतदेह किल्लारी पोलीस ठाण्यांतर्गत एका उसाच्या शेतात टाकला. दरम्यान, युसूफ नौरंगाबादी हे घरी आले नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला तसेच १२ ऑगस्टला हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. यावेळी किल्लारी पोलीस ठाण्यांतर्गत एका शेतात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी हा मृतदेह युसूफ नौरंगाबादी यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आसीफ युसूफ नौरंगाबादी यांच्या फिर्यादीवरून आकाश बाळासाहेब मस्के (रा. गर्देवाडी ता. अंबेजोगाई), जय गणेश शेळके (रा. दाती ता. कळमनुरी), शिवाजी गणपत दशरथे (रा. जोडपरळी ता. वसमत) यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, चालकाचे बरेवाईट करण्याच्या उद्देशाने कट रचून गाडी भाड्याने ठरवून नेली. तसेच चालकास मारहाण करून हातपाय दोरीने बांधून गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत उसाच्या शेतात टाकून दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून तपास सपोनि ए.डी. काचमांडे करत आहेत.
चालकाचे हात-पाय बांधून गळा आवळत केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:33 AM