हिंगोली : वसमत शहरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन केले आहे. हिंगोली-परभणी जिल्हास्तरीय तब्लीगी इज्तेमा बुधवारपासून प्रारंभ झाला. यात सहभागी होण्यासाठी मंगळवारपासूनच मुस्लिम बांधव येण्यास सुरुवात झाली. यामुळे इज्तेमाचे ठिकाण गर्दीने फुलून गेले आहे.
वसमत येथील नवोदय विद्यालयासमोर ७५ एकर प्रांगणात इज्तेमा आयोजित केला आहे. गत महिन्यापासून इज्तेमाची तयारी सुरु होती. इज्तेमाकरिता हिंगोली-परभणी जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने पार्कींग व्यवस्था, ६०० शौचालय, स्नानगृह, पाणी व्यवस्था, वीज, भव्य शामियाना आदिंची व्यवस्था केली आहे. खानावळीसाठी मोठ-मोठे झोन उभारले असून एकाच वेळी दीड लाख मुस्लिम बांधव नमाज आदा करतील असा शामियाना उभारण्यात आला आहे. आज सायंकाळी ६ वाजता नमाज आदा केली जाणार आहे. परभणी, हिगोंली जिल्ह्यासह इतर ठीकाणचे मुस्लिम बाधव मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झाली आहे.