कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील पांगारा (शिंदे) येथे शुक्रवारी सकाळी ८.४९ वाजेच्या सुमारास जमिनीतून सौम्य प्रकारचा गूढ आवाज आला. या आवाजामुळे पांगरा शिंदे येथील ग्रामस्थांत भीतीदायक वातावरण पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील वसमत व औंढा भागातील कुरुंदा, पांगरा व इतर गावांमध्ये अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. हे प्रकार नाही म्हटले तरी तीन ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहेत. हे आवाज नेमके कशामुळे येतात, हे अजून कुणालाही कळाले नाही. ३० सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के नाही तर गूढ आवाज आला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाला विचारले असता त्यांनीही धक्के नव्हे तर आवाज झाल्याचे सांगितले. जमिनीतून आवाज येताच पांगरा शिंदे येथील काही नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे यांनी नागरिकांची समजूत काढून धक्के नव्हे तर गूढ आवाज आहे, असे सांगितले.