हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग आणि उडीद खरेदीकरिता १५ सप्टेंबरपासून; तर सोयाबीनसाठी १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्यक्षात मात्र हमीदरापेक्षा बाजारात शेतमालाला अधिक दर मिळत असल्याने व उडीद, मूगाच्या उत्पन्नात विक्रमी घट झाल्याने 'नाफेड'ला शेतमाल देण्यास शेतकऱ्यांमधून नकार दर्शविण्यात येत आहे. परिणामी, जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर शेतकरी फिरकेनासे झाले आहेत.
जिल्ह्यात दरवर्षीच्या खरीप हंगामात अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक असते. त्याखालोखाल कापूस, मूग, उडीद या पिकांचे प्रमाणही बऱ्यापैकी असते. पिके ऐन भरात असतानाच अधूनमधून झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने सुमारे १ लाख ५३ हजार हेक्टरवरील पिके नेस्तनाबूत झाली असून नुकसानीच्या पंचनाम्यांची कामे सध्या सुरू आहेत. या नैसर्गिक संकटामुळे मूग आणि उडीद या पिकांच्या सरासरी उत्पन्नात विक्रमी घट झाली असून सोयाबीनचा एकरी अॅव्हरेजही घसरले. दुसरीकडे नाफेडच्या तुलनेत सोयाबीन, उडीद व मूग या शेतमालास अधिक दर मिळत आहे. या कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'नाफेड'च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, साखरा आणि जवळा येथे नाफेडची खरेदी केंद्र आहेत. त्यात केंद्र शासनाच्या दराप्रमाणे खरेदी होते.