- हबीब शेखऔंढा नागनाथ (जि. हिंगोली): श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जिल्ह्यासह विविध राज्यातील भाविकांनी पहाटे तीन वाजेपासूनच आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात गर्दी केली. नागनाथा तू आमच्यावर कृपादृष्टी ठेव, अशी प्राथना करत भाविकांनी हर हर महादेव, भोलेनाथ की जयच्या गजरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
श्रावणी सोमवारी पहाटे १२ :३० वाजेच्या दरम्यान देवस्थानचे विश्वस्त अॅड. शिवशंकर वाबळे उमरेकर, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी गर्भगृहात श्री नागनाथ प्रभूंना दुग्धाभिषेक करून महापूजा केली. यावेळी महापूजेचे आवर्तन पद्माक्ष पाठक, तुळजादास भोपी, जीवन ऋषी, आबागुरु बल्लाळ यांनी म्हंटले. महापूजेनंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. नागनाथाचे दर्शन सर्वांना सुखरपणे घेता यावे, म्हणून मंदिर संस्थान व पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धर्मदर्शन व पासधारक अशा स्वतंत्र दोन रांगेत भाविक उभे आहेत.
पहिला श्रावण सोमवार असल्याने राज्यासह परराज्यातून मंदिरात दर्शनासाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. वैद्यनाथ मंदिर समोरील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात असलेल्या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती. भाविकांसाठी काही सामाजिक संघटनांकडून साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, पाणी पाऊचचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, पहाटे चार ते दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास ९० हजार भाविकांनी दर्शन घेतले असे मंदिर संस्थांच्या वतीने सांगण्यात आले. तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी, २० अधिकारी यांच्यासह जवळपास ५०० पोलीस कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त मंदिर परिसरात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक जी. एस. राहिरे यांनी दिली.