जिल्ह्यात एकूण ९ लाख २४ हजार ९३५ इतके मतदार असून १२ हजार ३५८ इतक्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत. त्यापैकी ४९४ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत अद्ययावत झाले आहेत. मतदार यादीत नाव आहे; पण छायाचित्र नाही, अशा मतदारांनी आपले नजीकच्या कालावधीत काढलेले रंगीत छायाचित्र लवकरात लवकर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जमा करावेत. ज्यांचे छायाचित्र अद्याप निवडणूक विभागाला मिळाले नाहीत, त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येतील, असेही निवडणूक विभागाने सांगितले आहे.
- छायाचित्र काढण्याचे काम सुरू
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघात छायाचित्र काढण्याचे काम निवडणूक विभागाच्या वतीने सुरू आहे. आतापर्यंत निवडणूक विभागाने ४९४ जणांचे छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. आतापर्यंत छायाचित्र न दिल्यामुळे १ हजार ८३८ मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. शासनाची जशी सूचना येईल, त्याप्रमाणे निवडणूक विभाग काम करीत आहे. मतदारांनी आपले छायाचित्र केंद्राधिकाऱ्यांकडे नेऊन द्यावे, असेही निवडणूक विभागाने सांगितले.
हा कार्यक्रम कालमर्यादित स्वरूपाचा आहे. त्यामुळे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात नजीकच्या कालवधीत काढले असलेले आपले रंगीत छायाचित्र जमा करावे. तसेच मतदार यादी शुद्धीकरणकामी मतदारांनी निवडणूक विभागाच्या केंद्राधिकारी यांना सहकार्य करावे. आतापर्यंत ४९४ छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
- दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, हिंगोली