हिंगोली ( वसमत ) : नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देत आहे. दिवाळी जावू दे…दिवाळी गेली आता नवीन वर्षही लागले…संक्रात होवू दे..आत्ता तर त्यांचीच संक्रात झाली. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला एवढी केविलवाणी अवस्था करुन घ्यावी लागली आहे. हताश झालेले माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मला मंत्री करा. अशी अवस्था झाली आहे. सभागृहात एवढं वजन असलेला नेता का वाकतोय हेच कळेना अशीही टिका पवार यांनी केली.राज्यातील जनतेसाठी जे जाहीर केले आहे ते माझ्या शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, नारायण राणेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून जो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राहिलेला माणूस आज हातात कटोरा घेवून उभा आहे आणि दे माय दे माय..मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मात्र थांबा जरा सांगून थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते…थांब माझ्या बाळाला पावडर लावतो तसं मुख्यमंत्र्यांचं सुरु आहे…असा खेळ राज्यात मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुरु असल्याची घणाघाती टिका विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमतच्या जाहीर सभेत केली.
सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल
शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी नांदेड येथील कालच्या सभेत जनतेला केले होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी काल उमरी येथील सभेसाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार म्हणाले, शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ भरमसाट वाढ करण्यात आली आहे, सरकारनं दिलेली कर्जमाफीची घोषणाही फसवीच निघाली. शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यासह शेतीला लागणा-या साधन सामग्रीच्या किमतीत वाढ केल्याने शेतक-यांना जीव नकोसा झाला आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.