लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यापुर्वीच गावाचे पुर्नवसन करा किंवा रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी मागणी करूनही न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली.औंढा नगरपंचायत अंतर्गत प्रभाग २ मध्ये काजीदरा तांड्याचा समावेश आहे. येथील विलास राठोड यांची पत्नी सुभद्रा विलास राठोड (१९) यांना तापीचा आजार जडल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु रविवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. नांदेड येथून पार्थिव औंढा-हिंगोली रोडवर आणले. गावामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मृतदेह चक्क खाटेवर टाकून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. जो रस्ता आहे तो खाजगी मालकीचा असून केवळ पाऊलवाटच आहे. पावसाचे दिवस आहेत. रस्त्यावर चिखल झाल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. सदर महिलेला दवाखान्यात घेऊन जाताना देखील खाटावरच नेण्यात आले होते. वेळीच उपचार झाले असते तर महिलेचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया उपसभापती मोतीराम राठोड यांनी दिली. याच गावातून दहा दिवसांपुर्वी रंजना पवार या गरोदर मातेस प्रसुतीसाठी रस्ता नसल्याने पाठीवर घेऊन रुग्णालयात दाखल केले होते. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. रस्त्याअभावी आतापर्यंत पाच जणांना प्राणास मुकावे लागल्याचे राठोड म्हणाले. तांड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णालयात तसेच इतर कामासाठी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येथील ग्रामस्थांना पाऊल वाटच आहे. औंढा- हिंगोली या रस्त्यापासून तांड्याला जाणारे आंतर हे अर्धा कि.मी. पेक्षा जास्त आहे. हा रस्ता खाजगी मालकीच्या शेतामधूनच जातो. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी खा. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे यांच्याकडे मागणी केली. त्यांनीही रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले; परंतु काही खाजगी शेतकरी रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार नसल्याने या तांड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तांड्यात येण्यासाठी औंढा शहरापासून दर्गा मार्गे आंजनवाडा हा जुना पाणंद रस्ता आहे. परंतु तोही थेट गावात पोहचत नाही. याच तांड्यातील मोतीराम राठोड या हे न.प.वर सदस्य म्हणून निवडून गेले. शिवाय ते उपसभापती देखील होते. त्यांनी व ग्रामस्थांनी रस्ता द्या किंवा तांड्याचे पुणर्वसन करा या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. न.प.मुख्याधिकाºयांनी दखल घेत रस्त्याच्या जमिनीचा भुसंपादनाची तयारी दाखविली व तसे लेखी पत्र गावकºयांना दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले होते.
खाटारवरच नेला स्मशानभूमित ‘मृतदेह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:11 PM