- दयाशिल इंगोलेहिंगोली : मुले चोरणारे समजून धूळे जिल्ह्यात पाच जणांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातील भटक्या समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. या दहशतीपोटीच हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील नाथजोगी समाजातील एकही जण सोमवारी भिक्षुकीसाठी बाहेर पडला नाही.
हिंगोलीपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या कोथळज येथे मोठ्या संख्येने हा नाथजोगी समाज आहे. जवळपास ९० घरे असून लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. सात ते आठ कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला असून इतर इतर सर्व झोपड्या करून वास्तव्यास आहेत. भूमिहीन असल्यामुळे भिक्षुकी हेच त्यांच्या उपजिविकेचे साधन आहे. सोमवारी सकाळपासून धुळ्यातील घटनेचीच चर्चा येथे सुरू होती. भयभीत होऊन सर्वजण एकत्र मंदिर परिसरात कुटुंबियांसमवेत जमले होते.
सोमवारी नाथजोगी समाजातील एकही माणूस भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला नाही. शहरासह ग्रामीण भागातही भिक्षा मागणाऱ्यांकडे संशयीतरित्या पाहिले जात आहे. ‘परत गावात दिसू नकोस’ असा दमही दिला जात आहे, असे हे समाजबांधव सांगत होते. प्रशासनाने भटक्या समाजबांधवांवर होणारा अन्याय दूर करावा अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. जिल्ह्यात सांगवी, सिद्धेश्वर, अंजनवाडा, औंढानागनाथ, गोळेगाव, माथा, वगरवाडी आदी ठिकाणी हा नाथजोगी समाज वास्तव्यास आहे.
मुले शिक्षणाच्या प्रवाहातकोथळज येथील नाथजोगी समाजातील ६५ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल आहेत. ही मुले सध्या हिंगोली येथील वस्तीगृहात राहतात. समाजबांधवांचे मतदान यादीत नाव आहे, परंतु शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून ते कोसो दूर आहेत. मोजक्याच लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे.
मोर्चा काढण्यात येईल धुळ्यातील घटनेचा राज्यस्तरीय संघटनेतर्फे निषेध केला जाणार आहे. हिंगोली येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले जाणार असून मोर्चाही काढण्यात येणार आहे. - आप्पा काशिनाथ शिंदे, रा. कोथळज जि. हिंगोली.
कुटुंब चिंताग्रस्त अफवेमुळे होणाऱ्या हत्या घृणास्पद आहेत. भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडताना कुटुंब चिंताग्रस्त होत आहे. शहराकडे कामानिमित्त गेलल्या युवकाला थोडाही उशिर झाला तर काळजाचा ठोका चूकतो आहे. - बाबासिध्दू शितोळे, कोथळज जि. हिंगोली