सेनगाव (हिंगोली ) : शेतकऱ्यांची तातडीने संपूर्ण कर्ज माफी करावी,नवीन पिक कर्ज दयावे या सह इतर मागण्या करीता बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी, बँकाना नवीन पिक कर्ज वाटप करण्याचे आदेश द्यावे, गेल्या वर्षीचा खरीप पिक विमा देण्यासाठी कार्यवाही करावी, तालुक्यात वाढलेल्या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, निराधार योजनेचा जाचक अटी रद्द करावीत आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. येथील आजेगाव काँनरपासून काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.येथील मुख्य रस्त्यावरुन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चा चे रूपांतर जाहीर सभेत झाले.या वेळी बोलताना आमदार वडकुते यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली. तसेच शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ झाला नाही.बँका शेतकऱ्यांना पिक देण्यासाठी उदासीन आहेत. विमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवत असून शासनानेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
जिल्हा अध्यक्ष चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला राज्य शासन जबाबदार असल्याची टिका केली. या वेळी जि.प.उपाध्यक्ष अनिल पंतगे,विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,जि.प.सदस्य संजय कावरखे, तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे, नगराध्यक्ष संदीप बहिरे,माधव कोरडे,भागोराव पोले,युवक जिल्हा अध्यक्ष बालाजी घुगे,नगरसेवक कैलास देशमुख,उमेश देशमुख,शहर अध्यक्ष सचिन देशमुख ,विकास शिंदे,अंनता देशमुख यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थितीत होते.या वेळी मागण्यांचे निवेदन सेनगाव तहसीलदार यांना देण्यात आले.