लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी कधीच न दिसलेली गटबाजी मागील काही दिवसांपासून प्रकर्षाने समोर येत आहे. एकेका घटनेने हे गट-तट अधिक घट्ट होत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत तर याची चांगलीच झलक पहायला मिळाली.हिंगोलीत नगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीपूर्वी काहींनी पक्ष सोडला. त्यानंतर पुन्हा न.प. पदाधिकारी निवडीत काहींची नाराजी झाली. त्यानंतर विधानसभेच्या इच्छुकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी सुरू झाल्याने नवे गटतट उभे राहात आहेत. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला. त्यांनी नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या. काही दिवस त्याचा असर नेत्यांवर होता. त्यानंतर पुन्हा आ.रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यात गट-तटाची भिंत उभी राहात असल्याचे पहायला मिळत होते. अधून-मधून त्यांच्यात दिलजमाई होते. नंतर पुन्हा या अर्धवट भिंतीवर कार्यकर्त्यांतील वाद अथवा पदाधिकारी निवडीचे थर चढविले जातात. वाढत चाललेल्या या थराचा हिस्सा होण्यापेक्षा काहींनी अजून वेगळा गटच उभा करण्याची तयारी चालविल्याचे चित्र कालच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीनंतर दिसून आले. आधी नकार दिलेल्यांची पुन्हा निवड होत असल्याचे पाहून काहींनी आम्ही पक्षातच कशाला राहायचे, असा सवाल केला. त्यावर नेतेमंडळीही निरुत्तर झाली. वडकुते, चव्हाण, शेख शकील यांच्यासमक्ष शहराध्यक्ष जावेद राज यांनी आक्रमक भूमिका मांडली.एकीकडे राकाँ जिल्हाध्यक्षपदाचे घोंगडे भिजत पडलेले असताना इतर पदांवरूनच रान उठत आहे. त्यामुळे राकाँत एकवाक्यता कधी बघायला मिळेल, हा प्रश्नच आहे.राष्ट्रवादीने संघटन मजबुतीकरणासाठी काही मंडळींना पक्षात तर घेतले. मात्र त्यातील अनेकांकडून कानामागून आली अन् तिखट झाली, याचा साक्षात्कार पहायला मिळत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेतेमंडळीही या प्रकाराला थारा देत आहे. त्यामुळे निष्ठावंतांची मांदियाळी कुरापती करण्यात आघाडी घेत आहे. तर ज्यांच्याकडे संघटनाचे बळ आहे, ते या सर्व प्रकाराला दुर्लक्षून आपल्याच धुंदीत असल्याने नेतेही त्यांच्यापुढे हात टेकत आहेत.
राष्ट्रवादीत पुन्हा उफाळली गटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:59 PM