कयाधू परीसरात साचतोय कचरा
हिंगोली: जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या व शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीकाठावर कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढत आहे. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील कचरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असून यामुळे जलप्रदुषणात भर पडत आहे. त्यामुळे नदीकाठावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गौण खनिजाची वाहतूक वाढली
कळमनुरी : कळमनुरी तालुक्यात काही भागात गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता माळरानावर उत्खणन करून हजारो रूपये किमतीच्या गौण खनिजाची वाहतूक केली जात आहे.
अनेक वेळा ग्रामस्थांनी वाहने आडविल्यास वाहनचालकांकडून अरेरावीची भाषा केली जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रात्री दहा नंतर बस सोडण्याची मागणी
हिंगोली: येथील आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर बस धावत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होत आहे. मात्र रात्री दहा वाजेनंतर आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा येथे जाण्यासाठी एकही साधी बस उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयास कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन या मार्गावर रात्री दहा वाजेनंतर साधी बस सोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे.