हिंगोली : संपूर्ण जगात दूध उत्पादनामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. मात्र, मराठवाड्याचा विचार केला असता कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामधील एका तालुक्यात जेवढे दुग्ध उत्पादन होते. सुमारे तेवढेच उत्पादन संपूर्ण मराठवाडा क्षेत्रात होते. यादृष्टीने कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरीबांधवांनी दूध उत्पादनवाढीसाठी काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पुसद येथील डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सी. डी. खेडकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक दुग्ध व्यवसाय आणि मूल्यवर्धित दुग्धपदार्थ निर्मिती या विषयावर १ जूनला ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी देवणी व लाल कंधारी जातीच्या पशुधनावर माहिती देत खराब झालेले सोयाबीन भरडून आणि उकळून जर जनावरांना दररोज प्रमाणशीर खाऊ घातले तर फॅट वाढण्यासाठी चांगली मदत होईल. सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फॅट्स यांचे भरपूर प्रमाण असते आणि खराब झालेले सोयाबीन ढेपीपेक्षाही स्वस्त मिळते, असे डॉ. खेडकर यांनी सांगितले. तसेच दूध व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरीची पंचायत समितीमधून माहिती घेऊन ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके यांनी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाची सद्य:स्थिती आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात येणारे प्रयत्न, यासंदर्भात माहिती दिली. येथे जवळजवळ ८४ गीर गाईंचे गोपालन केंद्र उभारण्यात आले असून यामध्ये कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचा सहभाग घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बागल यांनी केले. डॉ. कैलास गीते व अनिल ओळंबे यांनी आभार मानले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला.