हिंगोली : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून उनाची दाहकता वाढतच चालली आहे. जंगलातील पाणवठेही कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात गावकुस जवळ करीत आहेत. मंगळवारी दुपारच्या वेळेला निलगायीचे दोन वासरे पाण्याच्या शोधात सेनगाव तालुक्यातील केलसुला शिवारात आली आणि पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीत पाय घसरून पडली. यानंतर शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून निलगायीच्या दोन्ही वासरांना अलगदपणे बाहेर काढत जीवदान दिले.
सेनगाव तालुक्यातील केलसुला शिवारात निलगायीची वासरे विहिरीत पडल्याची बातमी शेतकरी प्रकाश मुळे यांना कळताच त्यांनी आजूबाजुच्या शेतकऱ्यांना निलगायीची वासरे विहिरीत पडली आहेत असे म्हणून हाक दिली. यावेळी आजुबाजुचे सर्व शेतकरी धावत विहिरीजवळ आली. त्यांनी जवळपास दोन ते अडीच तास त्या निलगायीच्या वासरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मागच्या दोन महिन्यांपासून पाण्याच्या शोधात निलगाय, रानडुक्कर, वानरे, हरिण आदी वन्यप्राणी शेत परिसर व गावकुसात येत आहेत. या वन्यप्राण्यांना पाण्याची व्यवस्था करावी म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाला सांगितले. परंतु, वन विभागाने उन्हाळा सुरू होवून दीड महिना झाला तरी पाणवठ्यांची काही व्यवस्था केली नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात अशा विहिरी गाठाव्या लागत आहेत. निलगायीच्या दोन्ही वासरांना बाहेर काढण्यासाठी सरपंच भागवत भूतेकर,कान्होबा इंगळे, रामभाऊ बनगर, संजू सोनुने, संतोष पायघन यांनी प्रयत्न केले.
३० फूट विहिरीत सोडली दोरी...निलगायीचे वासरे विहिरीत पडल्याचे कळताच शेतकरी जमा झाले. परंतु, या वासरांना बाहेर कसे काढावे? हा प्रश्न सर्वांना सतावत होता. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी ३० फुट विहिरीत दोरी सोडली. या दोरीच्या सहाय्याने शेतकरी कमी प्रमाणात पाणी असलेल्या विहिरीत उतरले. त्यानंतर त्यांनी दोरी वासरांना बांधून अलगदपणे बाहेर काढून जीवदान दिले. शेतकऱ्यांनी धाडस दाखवून निलगायीच्या दोन्ही वासरांना जसे बाहेर काढले. तसे वन विभागाने या वन्यप्राण्यांसाठी धाडस दाखवून पाणवठे तयार करावेत, असे शेतकरी म्हणत होते.