हिंगोली : शेतातील आखाड्याला आग लागल्याने एक बैल, एक गाय, तीन म्हशींसह चार वगार होरपळल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी शिवारात १८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत धान्य, शेती उपयोगी अवजारे व एक दुचाकीही भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे.
निशाणा येथील शेतकरी प्रकाश मालजी सावळे यांचे शेत औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी शिवारात आहे. त्यांच्या गट क्रमांक १० मध्ये असलेल्या आखाड्याला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंगोली नगर पालिकेचे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. प्रखर उन्हामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत होते. सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत आखाड्यात बांधलेला एक बैल, एक गाय, तीन म्हशी व चार वगार अशी नऊ जनावरे होरपळली. तसेच आखाड्यावरील १० क्विंटल गहू, ८ क्विंटल ज्वारी, ३० क्विंटल सोयाबीन, २० क्विंटल हरभरासह इतर धान्य, शेतीउपयोगी अवजारांसह श्यामराव रामराव साळवे यांनी आखाड्यात ठेवलेली
दुचाकीही जळून भस्मसात झाली.घटनेची माहिती कळविल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. त्यानुसार शेतकरी प्रकाश सावळे यांचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे. तर याच आगीत श्यामराव सावळे यांची दुचाकी जळाली. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
मुक्या जनावरांचा जीव झाला व्याकूळ...गत पंधरा दिवसांपासून वातावरणात प्रखरता निर्माण झाली आहे. दुपारच्या वेळेला बाहेर पडणेही कठीण झाले असून, दिवसेंदिवस सूर्य आग ओकत आहे. अशातच सुरवाडी शिवारात गोठ्याला आग लागली. त्यावेळी या गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पळताभुई थोडी झाली. शेतकऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून मुक्या जनावरांचा जीव वाचविण्यात यश मिळविले. परंतु, प्रखर उन्हामुळे या मुक्या जनावरांना वेदना सहन करावी लागत आहे.
ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यावर संकट...नैसर्गिक संकटांमुळे यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत निशाणा येथील प्रकाश मालजी सावळे यांच्या आखाड्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. यामुळे या शेतकऱ्यावर संकट कोसळले असून, प्रशासनाने प्रकाश सावळे यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.