दि. २८ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हळद खरेदीचा लिलाव घेण्यात आला. बाजार समितीत एप्रिल महिन्यापासून हळद खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या हळद लिलावप्रसंगी रिसोड, उमरखेड, यवतमाळ, कारंजा तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळद आणली होती. कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी अजून रुग्ण आढळून येत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोरोनाचे नियम पाळत सर्व शेतकरी, व्यापाऱ्यांनी हळद खरेदीची लिलाव प्रक्रिया पार पाडली.
हळदीला ६ ते ७ हजार क्विंटल भाव
कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल महिन्यापासून हळद येणे सुरू झाले आहे. २८ जुलै रोजी जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद बाजार समितीत आणली होती. सद्य:स्थितीत हळदीला ६ ते ७ हजार रुपये क्विंटल भाव देण्यात येत असल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.