हिंगोली : संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील एक अभ्यासिका व दोन कृषी दुकाने अशा तीन दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंडापोटी त्यांच्याकडून १९ हजार ५०० रुपये वसूल केले.
कोरोना महामारीचे रुग्ण शहर तसेच ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे नगर परिषद व पोलीस विभागाच्या वतीने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकाच्या पथकाने कारवाईस सुरुवात केली.
यादरम्यान शहरातील हिलटाॅप काॅलनी येथील अभ्यासिका, नवा मोंढा येथील दोन दोन कृषी दुकाने सुरू होते. या तीन दुकानांनी संचारबंदी व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अभियंता गजानन हिरेमठ, प्रकल्प अधिकारी पंडित मस्के, बी. के. राठोड, संदीप घुगे, नितीन पहीनकर, संघरत्न नरवाडे, मनोज बुर्से, संदिप गायकवाड यांनी केली.
शनिवारी विनामास्क फिरणारे मोकाटच
नगरपालिका पथकातील कर्मचाऱ्यांचा वेळ संचारबंदीे काळात कोणती दुकाने सुरू आहेत, कोण संचारबंदीचे उल्लंघन करीत आहे आदी कारवाई करण्यात गेला. त्यामुळे शनिवारी विनामास्क व विनाकारण बाजारात फिरणाऱ्यांना रान मोकळे मिळाल्याचे पहायला मिळाले.