हिंगोली : ऐन सणासूदीत हिंगोली शहरातील एटीएम यंत्रात ठण-ठणाट होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहक एटीएम मशिनमध्ये रोकड आहे का नाही? याची चौकशी करत होते. त्यामुळे ग्राहकांची सणासुदीत धावपळ झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.हिंगोली शहरामध्ये विविध शाखेचे एटीएम मशिन आहेत. परंतु निम्म्याहून जास्त ठिकाणी यंत्रात रोकड नसल्याने मात्र ऐन सणासुदीत ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही शाखेच्या एटीएम मशिनच्या शटरवरच कॅश उपलब्ध नसल्याचे बोर्डही लावले होते. कॅश उपलब्ध नसल्याचे सांगत शाखा प्रबंधक मोकळे होतात. परंतु सणासुदीत तरी एटीएममध्ये जादा रोकड भरणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून दिल्या जात होत्या. यंत्रामध्ये पैसेच नसल्याने मात्र अनेकांनी स्वाईप मशिनचा आधार घेतला. तर काहींना याबाबत माहिती नसल्याने मात्र उसनवारीने व्यवहार करावा लागला. सणासुदीतही एटीएम यंत्रात रोकड नसल्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया होत्या.एटीएम बनले शोभेची वस्तूशिरडशहापूर : परिसरातील बहुतांश बँकांनी एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु ऐन दिवाळीच्या सणात या एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडत आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील काही एटीएम चालू तर काहीचे शटरच बंद होते. पैसेच नसल्याने ग्राहकांना सणासुदीत त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिरडशहापूर येथे स्टेट बँकेचे एटीएम आहे. २-३ महिन्यापासून हे एटीएम बंद होते. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू करून पैसे टाकण्यात आले होते. नागरिकांनी अडचण काही प्रमाणात दुर करण्यात आली होती. परंतु २ दिवसांपासून सर्वत्र दिवाळी सणाची धुम सुरू झाली आहे. खाद्यपदार्थाची रेलचेलही आहे. या शिवाय कपडे खरेदी तसेच विविध साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे. अशा काळात बँकांनी एटीएम सेवा सुरळीत ठेवणे गरजेचे असताना मंगळवारी व बुधवारी एटीएममध्ये खडखडाट होता. याकडे बँक अधिकारी कॅश टाकण्यासाठी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत आहे.
हिंगोलीत एटीएम यंत्रात नाही रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:29 AM