शिरड शहापूर (हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील सरपंच नंदा बालाजी ठोंबरे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव आज झालेल्या सर्वसाधारण सभेत १० विरुद्ध एका मताने संमत झाला.शिरड शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार डाॅ. कृष्णा कानगुले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला सरपंचासह ११ ग्रामपंचायत सदस्य सभागृहात उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या नोटिसीमधील विविध विषयांवरील मुद्यावर चर्चा करण्यात आली.
यादरम्यान १४ व्या वित्त आयोगातील निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायत देयक मंजुरी व चेक स्वाक्षरी करण्यास वेठीस धरणे, ग्रामविकास अधिकारी यांच्या खोट्या तक्रारी करणे, सदस्यांना विश्वासात न घेणे, गावात स्वच्छता व इतर कामे करण्यास टाळाटाळ करणे, मासिक बैठकीतून लोकांच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक निघून जाणे, जी. एस. टि ॲक्ट २७९ (१) चे उल्लंघन करणे, शासकीय आदेश पत्रांचा अवमान करणे. इत्यादी कारणावरून ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचावर नाराजी व्यक्त करून अविश्वास ठराव प्रस्ताव दाखल केला होता.
या बैठकीत सरपंचाच्या विरोधात सय्यद कुतुब, राहुल लांडगे, नागनाथ अंतेवार, शिवकांता आकमार, पूजा वाहटूळे, अनिता जोगदंड, सिताराम गजभार, शमशाद बेगम, शाहिदा बेगम या १० सदस्यांनी हात वर करुन मतदान केले. तर सरपंचाकडून पुष्पा रावले यांनी मतदान केले. तर एकजण बैठकीला अनुपस्थित राहिला. त्यामुळे १० विरुद्ध १ मतांनी अविश्वास ठराव पारित झाला आहे. यावेळी पीठासन अधिकारी तहसीलदार डाॅ. कृष्णा कानगुले, सचिव एस. एम. मुकणे, तलाठी मुकिर, वाईकर आदींनी काम पाहिले. यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.