हिंगोली: वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना अनेक महिन्यांपासून अर्थिक संकटात सापडला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.त्या संदर्भात साखर संचालक पुणे येथे गुरुवारी बैठक बोलावण्यात आली आहे.त्यातच आता सोमवारी १५ संचालकांच्या स्वाक्षरीने 'टोकाई' चे अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.अविश्वास ठरावावर अध्यक्षांच्या वडिलांचीही स्वाक्षरी आहे. काही संचालकांनी या स्वाक्षऱ्या फेब्रुवारी महिन्यात केल्याचे सांगत आम्ही अविश्वासाच्या बाजूने नसल्याचे सांगितले.
तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटातून मुक्त होत नाही.शेतकऱ्यांची एफआरपी थकली, बॅंकांचे कर्ज थकले आहे, कारखान्याची मशिनरी विक्री करण्यासंदर्भात निविदाही निघाल्या आहेत. सर्व संचालक मंडळांनी कारखाना जीवंत रहावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. साखर संचालक नांदेड यांच्या परवानगीने संचालकांनी तीन तातडीच्या बैठकाही घेतल्या.पण यावेळी अध्यक्ष व कार्यकारी संचालक मात्र उपस्थित नव्हते. त्यांनंतर संचालकांनी अध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन वर्ष अध्यक्षांवर अविश्वास ठराव मंजूर होणार नाही. त्यामुळे माघार घेतली होती.
टोकाई सहकारी साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास भाडेतत्वावर देण्यासाठी अध्यक्ष जाधव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भात ३० मे रोजी साखर संचालक पुणे येथे बैठक बोलावण्यात आली आहे. हे सर्व सुरु असताना २७ मे रोजी साखर संचालक नांदेड यांच्याकडे टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या १५ संचालकांच्या स्वाक्षरीने अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १५ संचालकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये अध्यक्षांचे वडिल माजी आमदार तथा संचालक मुंजाजीराव जाधव यांचीही स्वाक्षरी आहे. टोकाई अध्यक्षावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. पण अविश्वास ठराव मंजूर होणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
टोकाई संकटात अध्यक्षांचा पत्ताच नाही....टोकाई संकटात असताना संचालक मंडळांची कोणतीही बैठक नाही. संचालकांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकांनाही अध्यक्ष गैरहजर होते. शेतकऱ्यांची एफआरपी,बॅंकांचे देणे थकले आहे. असे असताना अध्यक्ष मात्र यावर एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे.- खोब्राजी नरवाडे, संचालक टोकाई