हिंगोली: राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नाही. हे पाहून एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीवर गाणे गाऊन आपली व्यथा मांडली. गाणे गाताना त्यांच्यासमोर महामंडळाच्या बसेस आणि स्वत:चे कुटुंब दिसत होते.
गत दीड वर्षीपासून एसटी महामंडळावर बसेस बंद ठेवण्याची वेळ येत आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. एवढेच काय, कुटुंबाला सोडून मुंबईसारख्या मोठ्या शहरात महामंडळातील बंधूसाठी ‘बेस्ट’च्या सेवेकरिता जावे लागत आहे. तेथून आल्यावर अनेक जण कोरोनाबाधित निघत आहेत. कोरोना महामारीने एसटी महामंडळाचा पैसा वाया घातला आहेच. दुसरीकडे कुटुंबाची ताटातूट करत आहे. कोरोना महामारी काय साध्य करू पाहत आहे, हे कळायला मार्ग नाही, असे कर्मचारी म्हणत आहेत.
कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या संख्येने निघत असल्यामुळे शासनाने ५० टक्के महामंडळात उपस्थिती ठेवा, असा आदेश काढला आहे. त्याप्रमाणे, महामंडळाने आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ज्यांना ड्युटी दिली आहे, अशांनीच कर्तव्यावर यावे, अशीही सूचना केली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे आणि दुसरीकडे महामंडळाची सेवा करण्याची घेतलेली शपथ, त्यामुळे घरी बसणे अनेकांना कठीण जात आहे.
संत कवयित्री कान्होपात्रा यांनी १५व्या शतकात ‘नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे’ हा लिहिलेला अभंग. १९६५ मध्ये ‘साधी माणसे’ या चित्रपटात हा अभंग लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केला आहे. या अभंगाचा आधार घेऊन स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे, कामगार सेनेचे विभागीय सचिव डी.आर. दराडे, प्रल्हाद बरडे, मुकेश ठोंबरे यांनी ‘नको कोरोना अंत आता पाहू, पैसा हा सर्वथा वाया जाऊ पाहे,’ अशी गाण्याची ओळ गाऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.