हिंगोली: न. प. च्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत गुंठेवारी या विषयावर चर्चा होऊन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी कमीत कमी दर आकारण्यात येईल. याप्रमाणे दर निश्चिती करण्यात येईल, असे सांगत गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावला.
१३ जुलै रोजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सर्वसाधारणसभेत एकूण १२ विषय ठेवण्यात आले. गुंठेवारी अधिनियम २०२१ अन्वये शहरातील नियमाप्रमाणे प्रकरणे नियमाधीन करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच गुंठेवारी अधिनियम २०२१ अन्वये नियमाधीन करताना लागणारा विकास कर कमीत कमी आकारावा, जेणेकरून जनतेवर जास्तीचा भार पडणार नाही, अशी मागणी नगरसेविका नाजनीन जावेदराज यांनी केली. यावेळी चर्चा होऊन मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी सांगितले की, कमीत कमी दर आकारण्यात येतील. याप्रमाणे दर निश्चिती करण्यात यईल.
शहरातील घराचे सर्वेक्षण (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा संकलन व वाहतुकीकरवर देखरेख करणे आणि नियंत्रण ठेवण्याकरिता कक्ष स्थापन्याची मान्यता देण्यात आली.
सभेत अनिता सूर्यतळ, नीता बांगर, सय्यद आमेरअली, बागवान अ. माबूद, सय्यद नाजनीन जावेद, पंचफुला लांडगे, शेख निहाल हाजी इस्माईल, आनंदा खंदारे, शेख आरेफ शेख हैदर, उषाताई धबाले आदींनी सहभाग नोदविला. यावेळी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, देवीसिंग ठाकूर, किशोर काकडे, कपील धुळे, अशोक गवळी, विनय साहू, संजय दोडल आदी उपस्थित होेते.
जातीवाचक नावे बदलण्याबाबत दिली मान्यता...
राज्य शासनाच्या ६ मे २०२१ च्या परिपत्रकाप्रमाणे शहरात असलेल्या १६ वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबत मान्यता देण्यात आली. लाड समितीच्या शिफारशीनुसार तीन सफाई कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याच्या प्रस्तावास, विविध योजनेतून नवीन विकासकामे करण्यास मान्यता देण्यात आली.