हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही अनेकांना अजून विमा मिळाला नाही. अर्ज फाटे करूनही काहीच फायदा होत नसल्याची भावना शेतकऱ्यांची झाल्याने रबी हंगामासाठी विमा काढण्याकडे फारसा कल दिसत नाही. यंदा अवघ्या ६०७० शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढला आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात अजूनही वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत शेतकरी पीक विमा काढताना दिसत नाहीत. १५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची यासाठी लगबग दिसत नाही. दुसरीकडे विमा कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपातील नुकसानीच्या पीक कापणी प्रयोगानुसारच्या व प्रत्यक्ष पाहणीतील अहवालानुसार विम्याच्या वाटपासाठी काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळेल, याचा विश्वास दिसत नसल्याने शेतकरी विमा काढण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.
खरीप नुकसानीचे अनुदानहिंगोली जिल्ह्याला खरीप नुकसानीच्या अनुदानाचा पहिला टप्पा ११२ कोटी रुपयांचा प्राप्त झाला आहे. शासनाने दिलेल्या या रकमेचे वितरण करण्यासाठी हा हप्ता तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने वितरितही केला आहे. आता हळूहळू इतर कामांतून वेळ मिळत असल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी या अनुदानाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करीत आहेत. मात्र त्याची गती मंद असल्याचे दिसत आहे.
विमा नशिबाचाच खेळमी पूर्वी पीक विमा काढायचो . मात्र नुकसान झाल्यावर मिळत नाही. नाही झाले तरीही मिळते, असे दिसले. हा नशिबाचाच खेळ झाला. वस्तुनिष्ठता नाही. हे असेच दरवर्षी घडते. त्यामुळे यंदा साडेपाच एकर गहू व टाळकी असूनही पीक विमा काढला नाही. त्यावर फारसा विश्वासच राहिला नाही. - सदाशिव तारे, सवड